Ad will apear here
Next
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग दोन


नमस्कार. प्रस्तावनेच्या या दुसऱ्या भागात आपण सर्वप्रथम श्रीसूक्ताच्या भक्तिरसभावनेविषयी जाणून घेऊ या. श्रीसूक्त उच्चारणास तसं कठीण आहे असं अनेकांना वाटू शकेलही, ते सत्यही आहे. श्रीसूक्तातील काही उच्चार, शब्दसंधी कठीण आहेत. वेदोक्त असल्याने त्याच्या पठणाचा अधिकार काहींना आहे, काहींना नाही वगैरे प्रवाद असतात. इथे मी माझ्या गुरुदेवांनी सांगितलेल्या नियमानुसार श्रीसूक्तविवेचन करणार असल्याने माझ्या ज्ञानानुसार आणि गुरुआज्ञेनुसार प्रत्येकाला श्रीसूक्ताचा अधिकार आहे. फक्त मागच्या लेखात दिलेल्या बंधनांबरोबरीने अशौच असताना म्हणजे म्हणजे सोयरसुतक (१० दिवस), मलमूत्रविसर्जनानंतर स्नान न करता, मासिक पाळीच्या काळात, अशुद्ध वातावरणात, मलिन कपड्यांत श्रीसूक्तपठण करू नये अशी गुरुआज्ञा आहे. 

श्रीसूक्तातील शब्दांचे उच्चार कठीण असल्याने जिभेला वळण देण्यासाठी प्रॅक्टिसची नितांत गरज आहे. एक तर तुम्ही परिचयातील ज्ञानसंपन्न अधिकारी व्यक्तीकडून श्रीसूक्ताची शास्त्रोक्त संथा (दीक्षा) घेणे किंवा यू-ट्यूबवर वेदोक्त श्रीसूक्ताच्या व्हिडिओवरून उच्चार शिकणे या दोन गोष्टी करणे क्रमप्राप्त आहे. उच्चारांची सुस्पष्टता अतिशय महत्त्वाची आहे. उच्चारांच्या आरोह-अवरोहांसंबंधात मी अनेक वेदोक्त ब्राह्मणांच्या उच्चारातही भेद बघितले आहेत. त्यामुळे त्यातही मला फारशी एकवाक्यता आढळली नाही, ही बाब मी अतिशय परखडपणे नमूद करतो... असो. आपला संबंध भक्तिभावनेशी आहे. त्यामुळे इथे उच्चार सुस्पष्ट, शक्य तितके लयबद्ध आणि चांगले असावेत. वरील मुख्य व उपबंधने पाळावीत इतके लक्षात असावे. 

श्रीसूक्ताचे पाठ हे शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर करावेत असा संकेत आहे. ते शक्य होत नाही. त्यामुळे निदान सकाळी नऊच्या आत तरी स्नानोपरांत पठण करणे अपेक्षित आहे. आंघोळ करून झाल्यावर स्वच्छ वस्त्रांनिशी, पूर्वाभिमुख बसून पाठ करावेत. श्रीसूक्त पठण हे शक्यतो जमिनीवर चटई, सतरंजी अंथरून केल्यास उत्तम. बेडवर करू नये. ज्यांना खाली बसणे शक्य नाही अशांनी सोफा, खुर्चीवर बसून केल्यासही हरकत नाही. इच्छा आणि वेळ असल्यास संध्याकाळी दिवेलागणीनंतर लगेचच श्रीसूक्ताचे पाठ करणेही उत्तम आहे. 

पाठसंख्या मी मागे सांगितल्याप्रमाणे किमान १,११,१६,५१,१०८ यांपैकी किंवा तुम्हाला जमेल तशी असावी. काही लोक महिन्याला (पौर्णिमा ते पौर्णिमा) १००८ पाठांचा संकल्प करून ते पाठ महिनाभरात जमतील तसे पूर्ण करतात असाही एक प्रघात आहे.

श्रीसूक्त दैनंदिन पठणाआधी खालील प्रार्थना करावी.

‘हे देवी श्रीमहालक्ष्मी माते, भगवान श्रीमहाविष्णूंसह तुझा अखंड निवास माझ्या घरात, वास्तूत असावा. तुझ्या कृपेने आमच्या आयुष्यातील नकारात्मकता, अनारोग्य, कर्ज, दारिद्र्य, अपयश यांचा कायमचा नाश होवो. माझ्यासह माझ्या समस्त कुटुंबीयांना तुझ्या कृपेने आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य, धन-संपत्ती, ऐश्वर्यप्राप्ती, सुयश, ज्ञान आणि सौख्ययुक्त मन:शांतीचा चिरकाल लाभ होवो. तुम्हा उभयतांच्या कृपेने आम्हाला या पृथ्वीवर एक सुरक्षित, आनंदी, समाधानी, यशस्वी, श्रीमंत आयुष्य जगता यावं हीच प्रार्थना आहे. ही प्रार्थना व ज्ञान माझ्याकडे ज्यांच्यामार्फत आले त्या सर्वांच्या बाबतीत मी सर्वतोपरी कृतज्ञ आहे.’

या प्रार्थनेनंतर विघ्नहर्त्या श्रीगणेशाचे, तुमच्या कुलदैवतांचे, वास्तुपुरुषाचे मानसिक स्मरण, प्रार्थना करावी. श्रीगणेशाय नम:, श्रीकुलदैवताय नम:, श्रीवास्तुपुरुषाय नम: असे म्हटले तरी चालेल. त्यानंतरचा मुख्य भाग म्हणजे भगवान श्रीमहाविष्णूंचे स्मरण करावे, ते पुढील ध्यानमंत्राने...

शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम्।
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्॥

श्रीसूक्ताच्या पाठाआधी भगवान श्रीमहाविष्णूंचे स्मरण करणे नितांत गरजेचे आहे हे लक्षात घ्यावे. जिथे भगवान श्रीविष्णूंचे स्मरणचिंतन, नामस्मरण केले जाते तिथे श्रीमहालक्ष्मीचा चिरकाल निवास असतो; पण जिथे ‘फक्त’ लक्ष्मीपूजन केले जाते तिथे ती येतच नाही. त्यामुळे तिच्या टिकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. श्रीमहाविष्णूंचे स्मरण केल्याशिवाय श्रीसूक्तपठणाला काहीच अर्थ नाही.

श्रीसूक्ताचे पाठ सुरू केल्यावर कृपया संध्याकाळी सूर्यास्तानंतर कोणालाही उधार-उसनवार पैसे देऊ नयेत (दुकानदारांची बिले चुकती करणे, एखाद्याच्या मेहनतीचे पैसे देणे, डिनरला गेल्यास बिल देणे, शॉपिंग याचे बंधन नाही. कारण त्याबदल्यात आपण सेवा/वस्तू घेतलेली असते) पैसे उधार देऊ नयेत. त्याचप्रमाणे विरजण, दही-दूध, कणीक, मीठ देणे कटाक्षाने टाळावे. (दुकानदारांना विक्रीसाठी हे बंधन नाही.)

अनेक भगिनींनी इनबॉक्समध्ये आमचे पतिराज रोज संध्याकाळी दारू पिऊन घरी येतात किंवा घरीच मद्यपान चालते असे प्रश्न विचारले आहेत. निदान दिवेलागणीच्या शुभ वेळी तरी मद्यपानाचे प्रसंग टाळता आले तर कधीही उत्तम. ज्या गोष्टी टाळता येणे शक्य नाही तिथे दुर्लक्ष करावे हे कधीही श्रेयस्कर. आपापली उपासना सुरू ठेवा. जमतील तेवढी बंधने स्वत: पाळत जा. घरातील प्रत्येकासाठी प्रार्थना अवश्य करा.

गुरुदेवांच्या म्हणण्यानुसार, श्रीसूक्त ही एक कठोर तपश्चर्या आहे. तुम्ही या जन्मात जे काही चांगले-वाईट प्रसंग भोगत असता त्यामागे मागील जन्मांतील कर्मांचे गूढ रहस्य दडलेले असते. श्रीसूक्ताच्या पठणाने कर्मबंधने सैल व्हायला मदत होते, अशुभ कर्मांचे दुष्परिणाम बऱ्याच अंशी कमी व्हायला मदत होते हे सत्य आहे; पण त्यासाठी नियमितता, वाट पाहण्याची तयारी हवी. उपासनेत सातत्य आणि सश्रद्धता हवीच. त्याशिवाय अनुभव येत नाहीत.

(क्रमश:) 

- सचिन मधुकर परांजपे, 
पालघर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PYZPCN
Similar Posts
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग एक विघ्नहर्ता श्रीगणेश, कुलदैवत श्री लक्ष्मीनारायण/महाकाली आणि सद्गुरूंच्या कृपेने श्रीसूक्त लेखमालेचा आरंभ करतो आहे. श्रीसूक्तावर विवेचन करणं हे माझ्यासारख्या अल्पमती, अल्पबुद्धी आणि सर्वसामान्य व्यावसायिक लेखकाच्या दृष्टीने शिवधनुष्य उचलण्यापेक्षाही दिव्य काम आहे याची पूर्ण जाणीव ठेवून, शक्य तितकं स्वत:च्या
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग तीन नमस्कार, आजपासून आपण मुख्य विवेचनास सुरुवात करू या. एका भागात एक किंवा दोन ऋचांचा समावेश करून, त्यावर विवेचन देऊन आपण श्रीसूक्त विवेचन पूर्ण करू या, असा माझा मानस आहे. शेवटच्या भागात मी पूर्ण श्रीसूक्त देईन. प्रत्येक ऋचेचा अर्थ जर आपणास नीट समजला, तरच श्रीसूक्त पठणास अर्थ आहे. ऋचेचा अर्थ नीट समजून तो
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग सहा लेखमालेच्या सहाव्या भागात आज आपण ऋचा क्रमांक सहा व सात यांचा अभ्यास करणार आहोत. मी मागेच सांगितल्याप्रमाणे श्रीसूक्त हे ऋग्वेदातील एक अतिशय प्रभावी सूक्त असून ते स्तुतिपर आहे. श्रीसूक्ताची प्रत्येक ऋचा ही मंत्रमय आहे असं म्हटलं, तरी ती अतिशयोक्ती होणार नाही हे सत्य आहे.
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग चार आजच्या लेखात आपण श्रीसूक्तामधील ऋचा क्रमांक दोन आणि तीनचा विचार करणार आहोत. या दोन्ही ऋचा श्रीसूक्तामधील अतिशय महत्त्वाच्या ऋचा मानल्या जातात. श्रीलक्ष्मीच्या अतिशय प्रभावी अशा स्तोत्रांपैकी श्रीसूक्त हे प्रमुख असल्याने ते तर्कशुद्ध, सुस्पष्ट आहे. त्या सूक्तामधील प्रार्थनेचं तंत्रही असंच मोकळं आणि मनस्वी आहे, हे आपल्या लक्षात येईल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language